Raju Shinde : ‘घरवापसी’ करून राजू शिंदेंचा संजय शिरसाटांना थेट इशारा! छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राजकीय भूकंप

Raju Shinde Joined BJP : 2019 चे शिरसाट विरोधक राजू शिंदे भाजपमध्ये दाखल; ‘आपल्या जीवावर मोठे झालेल्यांना धडा शिकवणार’ – शिंदेंचा नाव न घेता टोला
मुंबई :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट Sanjay Shirsat यांचे कट्टर विरोधक असलेले राजू शिंदे Raju Shinde यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
शिरसाटांच्या विरोधात लढलेले नेते भाजपमध्ये
राजू शिंदे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढताना एक लाखांहून अधिक मते मिळवली होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
‘घारवापसी’ आणि टीकास्त्र
भाजप प्रवेशानंतर राजू शिंदे यांनी ही आपली ‘घरवापसी’ असल्याचे म्हटले. त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला:
“मध्यंतरी तांत्रिक अडचण होती म्हणून तिकडे गेलो होतो. आता आपल्याच जीवावर जे मोठे झाले होते त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो.”
राजू शिंदे यांनी आपण भाजप कधीच सोडणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली काम करून छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’ केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
राजकीय समीकरणे बदलणार
राजू शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. शिंदे यांनी थेट शिरसाट यांच्या विरोधात लढून मोठी मते घेतली होती. आता ते भाजपमध्ये गेल्याने शिरसाट यांच्या मतदारसंघात भाजप-शिंदे गटाच्या महायुतीचे अंतर्गत समीकरण गुंतागुंतीचे होणार आहे. राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळे भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापासूनच 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.



