Rajasthan Bus Accident : जैसलमेर-जोधपूर महामार्गावर खासगी बस जळून खाक; 20 प्रवाशांचा करुण अंत, 16 गंभीर जखमी

PM Modi On Rajasthan Bus Accident : पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, मृतांच्या वारसांना 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर,मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातस्थळी भेट देत मदतकार्याचा घेतला आढावा
ANI :- राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी (14 ऑक्टोबर) दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका खासगी बसला अचानक लागलेल्या भीषण आगीत 20 प्रवाशांचा होरपळून करुण अंत झाला आहे, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. Rajasthan Bus Accident Latest Update
जोधपूरहून दुपारी 3 वाजता ही बस जैसलमेरकडे निघाली होती. जोधपूर-जैसलमेर महामार्गावरून प्रवास करत असताना चालकाला बसमध्ये आग लागल्याचा संशय आला. त्याने तातडीने रस्त्याच्या कडेला बस थांबवली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अनेक प्रवाशांना स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली नाही.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; मदतीची घोषणा
या भीषण दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले की, “जैसलमेर येथील बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. या संकट काळात बाधित झालेले लोक आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री शर्मांनी दौरा केला रद्द
घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने पाटण्यातील आपला नियोजित प्रचार कार्यक्रम रद्द केला आणि अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री शर्मा यांनी मदत आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या लष्करी जवानांचे आणि स्थानिक रहिवाशांचे यावेळी आभार मानले.
या दुःखद घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये भर रस्त्यात बस जळताना दिसत आहे. स्थानिकांनी मदतीसाठी प्रयत्न केले, पण आगीमुळे प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राजस्थानमध्ये शोककळा पसरली आहे.



