Raj Thackeray : ‘कोण जिंकलं, कोण हरलं?’: भारत-पाकिस्तान सामन्यावर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून भाष्य

Raj Thackeray On BCCI : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि सरकारवर निशाणा
मुंबई :- आशिया चषकात 14 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सरकार आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत पाकिस्तानविरुद्ध खेळल्याने, ‘नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं?’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला, तरी अनेक देशवासीयांनी पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी भावना व्यक्त केली होती. सरकार आणि बीसीसीआयने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याने हा सामना खेळला गेला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटून आपला संताप व्यक्त केला आहे.

व्यंगचित्रातून साधला निशाणा
राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय जवान दाखवण्यात आले आहेत. व्यंगचित्रात अमित शाह आणि जय शाह या जवानांना उद्देशून ‘अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले!’ असे म्हणत आहेत.


