Raj Thackeray : “शहरांची वाट लागलीय आणि कोणी बघायलाही तयार नाही!” – राज ठाकरे यांचा संताप

•Raj Thackeray On Mumbai Train Accident रेल्वे अपघातावरून परप्रांतीयांवर ठपका; टाऊन प्लॅनिंगचा अभाव आणि व्यवस्थेचा बोजवारा
पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत घडलेल्या रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली. या दुर्घटनेसाठी त्यांनी शहरांवर आदळणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना जबाबदार धरत संपूर्ण वाहतूक आणि नागरी व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.
“आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. कुठेही रस्ते नाहीत, पार्किंगची सोय नाही, फायर ब्रिगेडची गाडीही पोहोचू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी शासनाच्या शहर नियोजनावर आक्षेप घेतला.
मुंबईतील अपघातावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ही रेल्वे चालतेच कशी याचंच आश्चर्य वाटतं. मेट्रो आणि मोनो रेल असूनही गाड्यांचे रजिस्ट्रेशन कमी झालंय का? मग हे उपाय कशासाठी?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या ‘योजनेशिवाय अंमलबजावणी’वर बोट ठेवले. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले, “त्या दरवाज्यांनी लोक गुदमरून मरतील, एवढी गर्दी आहे!”
माध्यमांवरही ताशेरे ओढताना त्यांनी विचारले, “उद्धव ठाकरे आणि माझ्या एकत्र येण्याच्या बातम्यांना एवढं महत्व देता, पण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या बातम्या कुठे आहेत?” पत्रकारांनी शहरांतील मूळ प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले आणि रेल्वे मंत्रालयाने या भीषण अपघाताची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. “परदेशातून मंत्री काय पाहून येतात? कमीत कमी तिथले विचार तरी इथे आणा,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.



