
Raj Thackeray On Balasaheb Thackeray : “वारसा विचारांचा असतो, केवळ नावाचा नाही”; राज ठाकरेंनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली; पंतप्रधान मोदींकडूनही गौरवपूर्ण उल्लेख
मुंबई l आज 23 जानेवारी 2026, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 100 वा जन्मदिवस. या ऐतिहासिक दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देतानाच, सद्यस्थितीतील महाराष्ट्राच्या राजकारणावरही काही सूचक टिप्पणी केली आहे. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आणि कल्याण-डोंबिवलीतील युतीचा पेच या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले ?
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनमित्ताने राज ठाकरेंनी द्विशताब्दीसंदर्भातला उल्लेख केला आहे. “बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी आणि त्या व्यक्तीने आजदेखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.
राजकीय निष्ठांबाबत राज ठाकरेंनी मांडली भूमिका
दरम्यान, गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पोस्टमध्ये मांडलेल्या भूमिकांवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात. पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा”, असंदेखील या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.
“बाळासाहेबांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही…”
“बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहाणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे”, असा विश्वास राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केला आहे.



