मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : शिवतीर्थावर राज ठाकरेंची ‘भावनिक साद’! “जे गेलेत ते आपलेच, ते परत येतील”; नाराज कार्यकर्त्यांची जाहीर माफी

Raj Thackeray Shivaji Park Sabha Updates : ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक ‘मिलन’ सोहळ्यात राज ठाकरेंचे ‘मर्मबंधातील’ शब्द; मुंबई वाचवण्यासाठी पुन्हा एकवटली ‘ठाकरे’ ताकद!

मुंबई | शिवाजी पार्कच्या Thackeray Shivaji Park Sabha अथांग जनसागरासमोर आणि 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर उभं राहून राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपल्या खास शैलीत ‘मराठी मनाला’ साद घातली. “मी आणि उद्धव एकत्र येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ‘मुंबई’वर आलेलं संकट,” असे सांगत राज ठाकरेंनी युतीच्या प्रक्रियेत दुरावलेल्या कार्यकर्त्यांची जाहीरपणे हात जोडून माफी मागितली. त्यांच्या या भावनिक पवित्र्यामुळे शिवतीर्थावरील वातावरण पूर्णपणे भारावून गेले होते.

“तुमची नाराजी मी समजू शकतो…”

पक्षात झालेली गळती आणि तिकीट न मिळाल्यामुळे ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत राज ठाकरे यांनी अत्यंत मोठेपण दाखवले. ते म्हणाले, “20 वर्षांत मी पहिल्यांदाच युती करतोय, त्यामुळे ही प्रक्रिया राबवताना अनेकांना संधी देता आली नाही. काहींची मनं दुखावली गेली, काही रागावून दुसऱ्या पक्षात गेले. पण त्यांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही जे नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.” या शब्दांनी त्यांनी बंडखोर आणि नाराज सैनिकांना पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या घरात येण्याचं उघड निमंत्रणच दिलं.

बाळासाहेबांच्या आठवणींनी डोळे पाणावले

भाषणाच्या ओघात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “बाळासाहेबांच्या खांद्यावर बसून याच व्यासपीठावर मी अनेकदा आलो आहे. प्रबोधनकार, माझे वडील आणि आमची माँ हे सर्व आज हजर असते, तर हा क्षण अधिकच भावनिक झाला असता. पण मराठी अस्मितेसाठी पेटलेली ही ‘मशाल’ आणि धावणारं ‘इंजिन’ ते वरून नक्कीच पाहत असतील,” असे म्हणत त्यांनी ठाकरे घराण्याच्या वारशाची आठवण करून दिली.

मुंबईविरोधी डाव हाणून पाडणार!

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत येण्यामागची भूमिका स्पष्ट करताना केंद्रातील सत्तेवर आणि हिंदी सक्तीवर जोरदार प्रहार केला. “कोणत्याही वादापेक्षा आणि आमच्यातील मतभेदापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मुंबईला कुणीही लुटण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही दोघेही कडाडणारच,” असा कडक इशारा त्यांनी दिला. जे सोडून गेले आहेत ते कुठेही गेले तरी टिकणार नाहीत, कारण त्यांची नाळ याच मातीशी आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0