•स्वतः रेखाटलेले मुखपृष्ठ आणि यशवंत दत्तांचा अभिनय; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक राजकारणासोबतच त्यांच्यातील संवेदनशील कलाकारासाठीही ओळखले जातात. नुकतेच आपल्या घरातील ग्रंथालयात पुस्तके चाळत असताना त्यांच्या हाती ‘सुख पाहता’ या नाटकाचे पुस्तक लागले आणि त्यांनी 37 वर्षांपूर्वीच्या एका सोनेरी आठवणीला उजाळा दिला. या नाटकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः राज ठाकरे यांनी रेखाटले होते, हा रंजक इतिहास त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडला आहे.
वसंत कानेटकरांची ‘ती’ इच्छा आणि राज ठाकरेंची कलाकृती
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !
घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.
पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.
एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.
आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं.
मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…
राज ठाकरे ।
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…