Raj Thackeray On RSS : संघाच्या कार्यक्रमावरून जुंपली; “घाबरायचं असेल तर चुकीच्या कामाला घाबरा”, माजी राज्यपालांचा मनसे प्रमुखांना उपरोधिक टोला; भाषिक वादात आता ‘भीती’चे राजकारण
नाशिक | मुंबईत पार पडलेल्या संघाच्या व्याख्यानमालेत सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. “हे मान्यवर प्रेमापोटी नाही, तर नरेंद्र मोदींच्या सरकारी भीतीमुळे आले होते,” असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला होता. या दाव्याचा समाचार घेताना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाशिकमध्ये राज ठाकरेंना थेट ‘डिवचले’ आहे. कोश्यारी म्हणाले की, “राज ठाकरे मोदींना उगाच घाबरले आहेत, खरं तर त्यांनी घाबरण्याऐवजी मोदीजींच्या जवळ गेलं पाहिजे.”
कोश्यारी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘लहान भाऊ’ आणि ‘कडक नेता’ असा केला असला, तरी त्यांच्या टीकेतील धार कमी होऊ दिली नाही. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत राहणाऱ्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. जर घाबरायचे असेल, तर केवळ चुकीचे काम करायला घाबरा. मोदीजींसाठी सर्व प्रजा रामाच्या प्रजेसारखी समान आहे,” असे म्हणत कोश्यारींनी राज ठाकरेंचा ‘भीती’चा दावा त्यांच्यावरच उलटवला.
राज ठाकरेंची ती ‘लांबलचक’ पोस्ट अन् टीका
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…