Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिकांना पत्र, ‘आता हे आंदोलन थांबवायला हरकत…..’

Raj Thackeray On MNS Bank Andolan : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बँकेतील व्यवहारासाठी मराठीसाठी अग्रेसर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला दिले पत्र
मुंबई :- राज ठाकरे Raj Thackeray यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेमध्ये बँकेतील व्यवहार हे मराठीतूनच झाले पाहिजे. तसेच, बँकेतील व्यवहार मराठीत होण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि मनसैनिकांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र दिले. ज्या बँकेतील व्यवस्थापकांनी प्रश्न विचारले अथवा मराठी बाबत उच्चार काढला त्यांना राज ठाकरे च्या मनसे पक्षांनी चांगला समाचार दिला. असे असले तरी राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांना हे आंदोलन थांबवायला सांगितले आहे. राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना हे आंदोलन यशस्वी झाले असून संपूर्ण बँक व्यवस्थेला यातून मेसेज गेला आहे. त्यामुळे भविष्यात बँक आपली जबाबदारी स्वीकारून बँकेतील व्यवहार मराठीतून करेल अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांना थांबण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की,माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना..
सस्नेह जय महाराष्ट्र.सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.
मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.
पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की,रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !