मुंबईत ‘रेड अलर्ट’: पालकमंत्री शेलार यांनी घेतला आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा

Ashish Shelar Visit Mumbai Red Alerसीएसएमटी, दादर, कुर्ला स्टेशनसाठी बेस्ट बसेसची व्यवस्था करा; सखल व डोंगराळ भागांवर विशेष लक्ष
मुंबई :- मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सोमवारी शेलार यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकांतील परिस्थिती, शाळा-महाविद्यालये, उपनगरीय रेल्वेची स्थिती, तसेच सखल आणि डोंगराळ भागांमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
रेल्वे आणि बेस्टसाठी विशेष सूचना
पालकमंत्री शेलार यांनी उपनगरीय रेल्वे वाहतूक धीमी असली तरी ती बंद होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि कुर्ला यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्यास त्यांच्या सोयीसाठी बेस्ट बसेसची तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासोबतच, सखल भागांत साचणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवून पाण्याचा उपसा वेगाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


