मुंबई

Raj Thackeray : “मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल!”; राज ठाकरेंचा अदानी आणि भाजपवर प्रखर प्रहार

•मुंबई विमानतळ बंद करून अदानीच्या घशात घालण्याचा डाव; सर्वपक्षीय मराठी माणसांना एकत्र येण्याची भावनिक साद

मुंबई | “मुंबई आणि आसपासचा परिसर पद्धतशीरपणे गुजरातला जोडण्याचे षडयंत्र केंद्राकडून रचले जात आहे. अदानी उद्योग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली मराठी माणसाला आपल्याच जमिनीवरून हद्दपार केले जात आहे. जर मराठी माणूसच राहिला नाही, तर महापालिका कोणासाठी चालवणार?” असा जळजळीत सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या संयुक्त ‘शिवशक्ती’ मेळाव्यात ते बोलत होते.

मुंबई विमानतळ अदानीच्या घशात घालण्याचा कट?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात अदानी उद्योग समूहावर सर्वाधिक हल्ला चढवला. “मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्याच्या नावाखाली नवी मुंबईत विमानतळ उभारले जात आहे. पण मूळ डाव काही वेगळाच आहे. मुंबई विमानतळावरील सर्व वाहतूक नवी मुंबईकडे वळवून मुंबईचे विमानतळ कायमचे बंद करायचे आणि ती मोक्याची जमीन अदानीच्या घशात घालायची, असा सरकारचा डाव आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. गेल्या 10 वर्षांत अदानींच्या भरभराटीमागे मोदी सरकारची मेहरबानी असल्याचेही त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.

‘निवडणुकीत चुकलात तर कायमचे मुकाल’

मराठी माणसांमधील फुटीचा फायदा घेऊन मुंबईवर ताबा मिळवण्याचे कारस्थान सुरू असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, “आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून 20 वर्षांनंतर एकत्र आलो आहोत, कारण मुंबईवर मोठे संकट आहे. जर आज आपण एकत्र आलो नाही, तर मुंबईचे रूपांतर झारखंडसारख्या राज्यात व्हायला वेळ लागणार नाही.”

हिंदी सक्ती आणि अण्णामलाईंवर निशाणा

भाजपच्या ‘हिंदी सक्ती’च्या धोरणावर टीका करताना राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला. “माझा कोणत्याही भाषेवर राग नाही, पण जर आमच्यावर हिंदी लादली, तर आम्ही लाथ मारू. अण्णामलाई किंवा कृपाशंकर सिंह सारखे नेते मुंबईत येऊन मराठीचा अपमान करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

सत्तेचा माज आणि नीतिमत्तेचा अभाव

बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला दिलेले पद आणि अमली पदार्थ तस्करांना दिलेली उमेदवारी यावरून त्यांनी भाजपला धारेवर धरले. “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना तुरुंगात टाकले, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसता, हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे?” असा सवाल त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव न घेता विचारला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago