
Raj Thackeray On Bala Saheb : “माझ्या जखमा डेटॉलने धुण्यापासून ते भाषणातल्या बारकाव्यांपर्यंत… काका पहाडासारखा पाठीशी राहिला”; राज ठाकरेंचा ‘सामना’मधील विशेष लेख
मुंबई | बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी लिहिलेल्या लेखात त्यांच्यातील कौटुंबिक नाते आणि कलेचा वारसा कसा जपला गेला, याचे दर्शन घडते. राज ठाकरे Raj Thackeray म्हणतात की, “बाळासाहेब हे विद्यापीठात शिकवण्यासारखा विषय आहेत.”
राज ठाकरेंनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा उकळते पाणी अंगावर पडल्याने ते भाजले होते, तेव्हा बाळासाहेबांनी दोन महिने स्वतः बादलीभर पाणी आणि डेटॉल घेऊन राज ठाकरेंच्या जखमांची शुश्रूषा केली होती. “पक्षातून बाहेर पडण्यापेक्षा घराबाहेर पडणं माझ्यासाठी जास्त वेदनादायी होतं,” अशा शब्दांत त्यांनी स्वतःची व्यथा मांडली. 2006 च्या अपघाताची बातमी कळताच बाळासाहेबांनी काळजीपोटी केलेला फोन आजही राज ठाकरेंच्या मनात घर करून आहे.
अमिताभ यांना बाळासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला…
बाळासाहेब असं खूप मोलाचं सांगायचे आणि मी ते वेचत असायचो, त्यामुळे खूपच फायदा झाला. कलाकाराचं मन होतं त्याचं… त्यामुळे कलाकारांमध्ये मनसोक्त रमायचा. साल 1970… त्यावेळी शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता. त्याच काळात राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता. कम्युनिस्ट रशियामध्ये तेव्हा राज कपूर लोकप्रिय होते. ‘मेरा नाम जोकर’मधील काही प्रसंग हे कम्युनिस्टधार्जिणे आहेत असं बाळासाहेबांच्याही कानावर आलं होतं. तेव्हा राज कपूर यांनी बाळासाहेबांना सांगितलं की, तुम्ही एडिटिंगला बसा आणि तुम्हाला जे प्रसंग खटकतील ते मी काढून टाकतो. बाळासाहेबांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार चित्रपटात बदल करण्यात आले, इतके त्यांचे संबंध चांगले होते. हा प्रसंग मी थेट बाळासाहेबांकडून आणि माझ्या वडिलांकडून ऐकलेला आहे. माझ्यासमोर घडलेले बरेच असे प्रसंग आहेत, ज्यातून बाळासाहेब आणि चित्रपटसृष्टी यांच्यातला स्नेह मला जाणवायचा. अर्थात, तो काळही वेगळाच होता. आत्तासारखं बरबटलेलं, बुरसटलेलं वातावरण नव्हतं. एकमेकांच्या त्तत्त्वांचा आदर ठेवून वागणारी माणसं होती ती…
माझ्यासमोर घडलेला एक प्रसंग सांगतो. बोफोर्स प्रकरणावरून जेव्हा रान उठलं होतं, तेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांचे बंधू अजिताभ हे बाळासाहेबांना भेटायला ‘मातोश्री’ वर आले होते. अमिताभ तेव्हा चिंताग्रस्त दिसत होते. ‘बोफोर्स’ खरेदी घोटाळ्यात त्यांचंही नाव गोवलं गेलं होतं आणि देशभरातील वर्तमानपत्रांतून त्यांच्यावर टीका होत होती. अमिताभ यांना बाळासाहेबांनी पहिला प्रश्न विचारला, ‘या प्रकरणात खरंच तू निर्दोष आहेस का?’ त्यावर अमिताभ यांनी बाबूजींची म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांची शपथ घेत सांगितलं की, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मग बाळासाहेबांनी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना एक पत्र पाठवा असं अमिताभ यांना सांगितलं आणि पत्राचा मसुदाही तयार करून दिला. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला पत्र लिहिताना ते कसं लिहायचं याचा बाळासाहेबांचा अभ्यास होता आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतंच. अमिताभ बच्चन यांचं ते पत्र व्ही. पी. सिंग यांच्याकडे गेलं आणि तिथपासून वातावरण निवळायला सुरुवात झाली. बाळासाहेबांचा करिष्मा हा असा होता. बाळासाहेब हे मराठी माणसाला जसे आधार वाटायचे, तशीच भावना या सर्व कलाकारांचीही असायची. राजेश खन्ना यांना अनेकदा ‘मातोश्री’वर बाळासाहेबांशी गप्पा मारताना मी बघितलंय. एक सुपरस्टार आणि एक राजकारणी, असं मुळीच जाणवायचं नाही. राजकारण बाजूला ठेवून बाळासाहेब जुन्या आठवणींमध्ये रमायचे. स्वतःच्या नावाचा दरारा जाणवू न देता, बाळासाहेबांनी ज्याप्रकारे मैत्री टिकवली, तो दिलदारपणा… हे त्यांचं खास वैशिष्ट्य होतं. कलाकार आणि कलेबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती.
मायकल जॅक्सनच्या भेटीत काय घडलं?
मायकल जॅक्सन यांची कॉन्सर्ट जेव्हा मुंबईत झाली, त्यापूर्वी बाळासाहेबांना त्याबद्दल कल्पना नव्हती, पण त्यावेळी मी एक गोष्ट आवर्जून केली. मायकल जॅक्सन यांचं जेव्हा भारतात आगमन होईल तेव्हा ते आधी बाळासाहेबांना भेटतील अशी अट मी घातली होती. मायकल जॅक्सन यांच्या टीमने तेव्हा बाळासाहेबांबद्दल रिसर्च केला होता. बाळासाहेब ठाकरे ही भारतातील किती महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्यांना समजलं होतं आणि तसाच आदर मनात ठेवून मायकल जॅक्सन बाळासाहेबांना भेटले होते. ती भेट ठरल्याप्रमाणे झाली. तिथून मायकल जॅक्सन हे ओबेरॉय हॉटेलात गेले, मग कॉन्सर्ट झाली, पण मायदेशी परतण्यापूर्वी त्यांनी निरोप पाठवला की, काल खूप गर्दी झाल्यामुळे बाळासाहेबांना नीट भेटता आलं नाही, त्यांना पुन्हा एकदा भेटायचंय.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा ‘मातोश्री’वर आले. छान गप्पा झाल्या. अगदी तिथल्या पोलिसांबरोबर फोटोही काढले आणि मगच ते विमानतळाकडे रवाना झाले. पहिल्या भेटीच्या वेळेस छायाचित्रकार होते, नेते होते, गर्दी होती… पण तेवढ्या वेळेतही बाळासाहेब जे काही बोलले असतील, त्यातून पुन्हा भेटण्याची, थोड्या निवांत गप्पा मारण्याची इच्छा मायकल जॅक्सन यांना झाली. एवढ्या एका घटनेवरून लक्षात येईल की बाळासाहेब ठाकरे या नावाचं गारुड काय होतं ते…
बाळासाहेबांना कलेची जाण होती. कलेबद्दल आदर होता. देश, भाषा यांच्या सीमा कधी त्या प्रेमाच्या आड आल्या नाहीत. पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन, गुलाम अली यांची गझल बंद केली नाही. दोन देशांचे संबंध बिघडलेले असताना आजही मी आणि माझा पक्ष, जेव्हा पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूंच्या भारतातील इव्हेंट्सना विरोध करतो, तेव्हा तो विरोध त्या कलाकाराला किंवा खेळाडूला कधीच नसतो. हे बाळासाहेबांनीच केलेले संस्कार आहेत. मी नेहमीच हे सांगत आलोय, की संस्कार केले जात नाहीत, ते वेचावे लागतात. बाळासाहेबांना मी लहानपणापासून जवळून बघितलंय. त्यांनी कधीच राजकीय ताणतणाव घरी आणले नाहीत. बाहेर कितीही राजकीय गदारोळ असू दे, त्याचा कुटुंबावर कधी परिणाम त्यांनी जाणवू दिला नाही. घरी ते अगदी कुटुंबवत्सल भूमिकेत असायचे. थट्टा-मस्करी अगदी नेहमीसारखी चालायची. या त्यांच्या वागण्याचेही नकळत संस्कार माझ्यावर झालेले आहेतच.



