
Raj Thackeray On Hindi Language: राज्य शासनाच्या आदेशावरून मनसेचा विरोध, शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवणार – राज ठाकरे
मुंबई | राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, यावरून बुधवारी राज्यात मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. Raj Thackeray On Hindi Language या आदेशाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका केली.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “17 जून रोजी मीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हिंदी सक्तीबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना केली होती. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती एक राज्यभाषा आहे. त्यामुळे ती लादणे चुकीचे आहे.”
ठाकरे यांनी सांगितले की, “आज मी राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवत आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की, हा निर्णय मागे घेतला जात आहे. त्यामुळे मी पाच दिवसांपूर्वीच हे पत्र तयार केले होते, जे आता मी पाठवत आहे.”
त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “उत्तरेकडील राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार का? गुजरातमध्ये हिंदी अनिवार्य नाही. मग महाराष्ट्रातच का?” तसेच “IAS लॉबीचा दबाव आहे का? विद्यार्थ्यांवर भाषेची सक्ती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शासनाच्या नव्या आदेशानुसार, राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा शिकायची असल्यास, ती भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असावी, असा अटीनिशी नियम जाहीर करण्यात आला आहे.


