Raj Thackeray : 30 ते 40 हजार रुपये प्रति एकर मदत द्या’; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Raj Thackeray On Maharashtra Sarkar : सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका, ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’
मुंबई :- अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने एकरी किमान 30 ते 40 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मदत करताना सरकार करत असलेल्या जाहिरातबाजीवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.
सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या मोहापासून दूर राहून सरकारने तातडीने मदत करावी.” अतिवृष्टीमुळे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, कित्येक ठिकाणी शेतीची जमीन वाहून गेली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारकडे मदतीची मागणी
राज ठाकरे यांनी सरकारला कुठल्याही निकषांची चौकट न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. “एकरी 7 ते 8 हजार रुपयांच्या तुटपुंज्या भरपाईने काहीही होणार नाही,” असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याचे आवाहन केले. “केंद्र सरकारने बिहारला जसे मदतीचे पॅकेज दिले आहे, तशीच मदत महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. त्यासाठी दिल्लीत पाठपुरावा करावा,” असे राज ठाकरे यांनी सुचवले.
बँका आणि आरोग्य यंत्रणेलाही इशारा
या संकटाच्या काळात रोगराई वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हा रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा पडणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.
याशिवाय, बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची सक्ती करू नये, असा इशारा त्यांनी दिला. जर बँकांनी शेतकऱ्यांची छळवणूक केली, तर मनसेचे कार्यकर्ते बँकांना धडा शिकवतील, असा थेट इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.


