
Raj Thackeray On Election Commission : प्रचाराची तोफ थंडावल्यावरही भेटीगाठींची मुभा कशासाठी? “पैसे वाटण्यासाठीच हा घाट घातलाय”; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
मुंबई | मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असताना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “प्रचाराची मुदत संपल्यावर पुढचा दिवस शांततेचा आणि त्यानंतर मतदान, ही आजवरची प्रथा होती. मग यंदाच मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी जाऊन भेटी घेण्याचा नवा नियम कशासाठी?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“पैसे वाटण्यासाठीच नवीन पद्धत?”
निवडणूक आयोगाने नुकत्याच काढलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेता येणार आहेत. यावर राज ठाकरे कडाडले. ते म्हणाले, “ही नवीन पद्धत आजच कशी आली? विधानसभा किंवा लोकसभेला हा नियम का नव्हता? केवळ सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या सोयीसाठी हा बदल केला आहे का? उमेदवारांना घरोघरी जायला परवानगी देणे म्हणजे प्रत्यक्षात ‘पैसे वाटायला’ मुभा देणेच आहे.”
‘पाडू’ मशीनवरून संशय व्यक्त
राज ठाकरे यांनी केवळ निवडणूक प्रक्रियेवरच नव्हे, तर ‘पाडू’ नावाच्या नवीन प्रिंटिंग ऑक्जिलरी युनिटवरही (EVM शी संबंधित मशीन) संशय व्यक्त केला. “हे ‘पाडू’ मशीन नेमके काय आहे? ते दिसते कसे? कोणत्याही राजकीय पक्षाला हे युनिट दाखवण्याचे सौजन्य आयोगाने दाखवलेले नाही. ईव्हीएम जुनी झाली म्हणून हे नवे युनिट लावले जात आहे, पण त्यातून नक्की काय साध्य करायचे आहे, हे लोकांना माहीत नाही,” असे ते म्हणाले.
मनसे-शिवसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश
सत्ताधारी पक्षाकडून भाजप आणि शिंदेंच्या पत्रकांमध्ये (Pamplets) पैसे टाकून वाटले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. “मी शिवसैनिक आणि मनसेसैनिकांना सांगतो, डोळ्यात तेल घालून सतर्क राहा. उमेदवार लोकांकडे जात आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा. निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, हा आमचा उघड आरोप आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचे आदेश दिले.


