Raj Thackeray On Child Kidnapping : “एनसीआरबीनुसार प्रमाण ३०% नी वाढले, तरी सरकार करतंय काय?”; डीएनए तपासणीची मागणी, विधिमंडळातील शांततेवर राज ठाकरेंचा संताप
मुंबई :- राज्यभरात लहान मुले आणि मुली पळवण्याच्या गेल्या काही दिवसांपासून घटना वारंवार समोर येत असल्याच्या गंभीर मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना थेट पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. मुलांचे अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळ्या कार्यरत असूनही सरकारकडून ठोस कृती होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधताना एनसीआरबीच्या (NCRB) आकडेवारीचा आधार घेतला.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही…
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरे ।
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…