Raj Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी दिला 24 तासांचा अल्टिमेटम

•Raj Thackeray On Meenatai Statue : ‘सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांत आरोपींना शोधा’, राज ठाकरेंची पोलिसांना सूचना ,उद्धव ठाकरेही पुतळ्यास्थळी पोहोचणार; शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण
मुंबई :- दादरच्या शिवाजी पार्क मैदानाजवळ असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. काल (16 सप्टेंबर) रात्री ही घटना घडली असून, आज (17 सप्टेंबर) दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
राज ठाकरेंचा पोलिसांना अल्टिमेटम
घटनेची माहिती मिळताच राज ठाकरे तातडीने शिवाजी पार्कला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. राज ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी केली आणि पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना जाब विचारत, “सगळे सीसीटीव्ही चेक करा आणि २४ तासांमध्ये आरोपींना शोधून काढा,” अशी सक्त सूचना दिली.
उद्धव ठाकरेही पुतळ्याला भेट देणार
या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या नेत्यांकडून माहिती घेतली आहे. शाखाप्रमुखांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे देखील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला भेट देणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी असलेल्या मीनाताई यांचे 1995 साली निधन झाले होते, त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. ही घटना शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी असल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.



