‘राज ठाकरे आणि मी मराठीच्या मुद्द्यावर एकत्रच राहणार!’ शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचे युतीचे स्पष्ट संकेत; भाजपला दिला ‘हिंदुत्वाच्या ढोंगा’वरून कडक इशारा

•’हिंदीला विरोध नाही, पण सक्ती झाल्यास कडवा विरोध’; भाजपने मुंबईत हिंदू-मुस्लीम फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) झालेल्या दसरा मेळाव्यात आगामी राजकारणाची स्पष्ट दिशा दर्शवली. पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना, ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले, तसेच भाजपवर जोरदार राजकीय हल्ला चढवला.

मराठीसाठी ‘राज’ आणि ‘उद्धव’ एकत्र!
राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हिंदीला आमचा विरोध नाही. पण हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल. मराठीच्या मुद्द्यावर मी आणि राज ठाकरे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच. यामुळे मराठी माणसांमध्ये फूट पडू देणार नाही,” असे सांगत त्यांनी मराठी मतांच्या एकीकरणाचे मोठे संकेत दिले.
‘भाजपने हिंदुत्व शिकवू नये!’
भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाकरे यांनी सडकून टीका केली. “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने आम्हाला शिकवू नये. तसेच हिंदुत्वाचे ढोंग व सोंग सोडावे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला चपराक लगावली.
मुंबईच्या निवडणुकीवर गंभीर प्रश्न
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. “मुंबई महापालिकेची निवडणूक होईल की नाही, याबाबत शंका आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘मुंबईत भाजपचाच महापौर’ या घोषणेचा उल्लेख करत ते म्हणाले, “यासाठी भाजपने मुंबईत हिंदू-मुस्लीम अशी विभागणी सुरू केली आहे. भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही.” तसेच, रस्त्यांवरील खड्डे आणि नागरी सुविधांचा अभाव यावरून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर ‘मुंबईचा विचका केल्याचा’ आरोप केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. “शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली जात नाही? 2017 मध्ये फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अजूनही पूर्ण झाली नाही, पण मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्याची पूर्तता केली होती,” असे सांगत त्यांनी भाजप नुसत्याच घोषणा करत असल्याचा टोला लगावला.
अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा इशारा अतिवृष्टीमुळे शेतकरी पार खचला आहे. त्याला केवळ घोषणा नको, तर मदतीची खरी गरज आहे. कर्जमाफीसाठी शिवसेना मराठवाड्यात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.


