मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव; मळमळ पुन्हा बाहेर ओकली!”

Raj Thackeray On Jitendra Shah : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या ‘बॉम्बे’ विधानावर राज ठाकरे आक्रमक; “तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय,” मराठी माणसाला जागे होण्याचे आवाहन!

मुंबई :- आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. “मला आयआयटी बॉम्बेचं (IIT Bombay) नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे,” असे विधान सिंह यांनी केले होते.

जितेंद्र सिंह यांच्या या विधानाचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे. त्यांनी थेट केंद्राच्या मानसिकतेवरच निशाणा साधला आहे.

सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक

राज ठाकरे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जितेंद्र सिंह यांचे विधान हे “सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे” हे स्पष्टपणे दिसत आहे.

“मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!”

जितेंद्र सिंह यांचा मुंबई किंवा महाराष्ट्राशी थेट संबंध नसतानाही, त्यांनी असे विधान करणे म्हणजे “आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे” हाच त्यांचा उद्देश असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

‘मुंबई’ नाव खटकण्यामागे काय कारण?

राज ठाकरे यांनी या निमित्ताने एमएमआर परिसरात राहणाऱ्या मराठी जनांना “आता तरी डोळे उघडा” असे आवाहन केले आहे. ‘मुंबई’ हे नाव मराठी माणसाच्या मुंबा आईच्या (मूळची देवी) नावावरून घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. “तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव?

राज ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा गंभीर डाव शिजत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

“असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. ‘मुंबई’ नको, ‘बॉम्बे’च हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो!”

राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघात करत, इथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे, हे आपण रोज पाहत आहोत, असे नमूद करत मराठी माणसाला भावनिक साद घातली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0