Rahul Kul : ३ जुलै यवत तर ४ जुलै वरवंड येथे पालखी मुक्काम ; विसाव्याच्या तळाची पाहणी ; वैष्णव भक्तांना सोयी-सुविधा पुरवणार : आ. राहुल कुल
दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी
दौंड, ता. २२ संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी आमदार राहुल कुल यांनी शुक्रवारी ( दि २१ ) केली. यवत, वरवंड या गावांतील मुक्काम तळांची पाहणी करत पालखी सोहळ्यात येणाऱ्या लाखो वैष्णव भक्तांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे आ. राहुल कुल यांनी सांगितले.
तालुक्यातील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये भाविकांची दर्शन रांग, विसाव्याच्या ठिकाणी मंडप, मुक्कामासाठी वारकऱ्यांच्या उभारण्यात येणाऱ्या राहुट्यांचे ठिकाणी, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, पोलिसांकडून संरक्षणासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची साठे आणि त्यांची तपासणी करून पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक, सहायक, आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर खाजगी व शासकीय रुग्णवाहिकादेखील सेवेत असणार आहेत.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येणार आहे. जागोजागी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत वतीने करण्यात येणार आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी दौंड तालुक्यात सर्व व्यवस्था तैनात करण्यात येणार असून कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेत असल्याचे कुल यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीश्चंद्र माळशिखरे, मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, दत्तात्रय पठारे, नामदेव बारवकर, गोरख दिवेकर, समीर दोरगे, अशोक फरगडे, बाळासाहेब लाटकर आदी यावेळी उपस्थित होते.