Maharashtra News: “विश्वास, विकास आणि विश्लेषण” — शुभेच्छांच्या राजकारणात शिंदेंची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

Eknath Shinde Post : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस एकाच दिवशी; शिंदे यांच्या शब्दसामर्थ्याची सोशल मीडियावर चर्चा
मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या विविध रंग उधळले जात असताना, एकाच दिवशी आलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छा पोस्टने चर्चेचे वादळ उठवले आहे. सामाजिक माध्यमांवर टाकलेल्या या दोन वेगळ्या पोस्टमध्ये केवळ औपचारिक शुभेच्छा नाहीत, तर ‘विश्वास’, ‘मैत्री’, ‘सहवास’ आणि ‘विकास’ या शब्दांनी सत्तेच्या त्रिकोणात सूचक राजकीय संदेशही पोचवले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शिंदेंनी लिहिलं
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे
महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे
महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!
सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! जीवेत शतम शरद:!!
दुसऱ्या पोस्टमध्ये अजित पवार यांना उद्देशून शिंदे म्हणतात,महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना! जीवेत शतम शरद:!!


