Pune Tadipar News : पिंपरी-चिंचवड निवडणुकीपूर्वी पोलिसांचा ‘क्लीन स्वीप’! 35 सराईत गुंड तडीपार; राजकारणाशी संबंधित व्यक्तीही रडारवर

•’अत्यंत संवेदनशील’ केंद्रांवर सीसीटीव्ही आणि अतिरिक्त बंदोबस्त; 159 गुन्हेगारांची यादी तयार
पिंपरी-चिंचवड | आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा राडा किंवा अडथळा येऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. नोव्हेंबर महिन्यात गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एकूण 35 सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या या कारवाईत काही राजकारणाशी संबंध असलेल्या ‘वजनदार’ व्यक्तींचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कुणावर झाली तडीपारीची कारवाई?
पोलिसांनी गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार तडीपारीचे वर्गीकरण केले आहे:
दोन वर्षांसाठी तडीपार
निगडीतील आयुब खान, विशाल खरात, थेरगावचा रोहन वाघमारे, वाकडचे ऋतिक व गौरव ढसाळ, भोसरीतील अशोक गोंधने यांसह 20 गुंडांना दोन वर्षांसाठी शहराबाहेर काढले आहे.
एक वर्षासाठी तडीपार:
पिंपरीतील शुभम गायकवाड, पिंपळे गुरवचा शुभम नावळे आणि भोसरी एमआयडीसीतील परशुराम ढेपे यांसह 10 जणांवर एका वर्षाची कारवाई झाली आहे.
सहा महिन्यांसाठी तडीपार:
रावेतचा गंगाधर नाटेकर आणि चाकणचा राजकुमार बिंद यांसह 5 जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.
राजकीय नेत्यांवर पोलिसांची ‘वॉच’
निवडणुकीच्या काळात वातावरण बिघडू नये, म्हणून पोलिसांनी 159 महत्त्वाच्या व्यक्तींची यादी तयार केली आहे. यामध्ये अशा काही नेत्यांचा समावेश आहे ज्यांचा पूर्वीच्या वादात सहभाग होता किंवा ज्यांच्या समर्थकांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. स्थानिक प्रभाव आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईची टांगती तलवार आहे.



