Beed Breaking News : रक्षकच बनला भक्षक; पोलीस दलात खळबळ, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!

Beed Police Crime News : खाकी वर्दीला काळिमा! बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार
बीड :- आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी धावून येणारे पोलीसच जेव्हा आपल्या कर्तव्याला आणि विश्वासाला तडा देतात, तेव्हा समाजाचा आधारच ढासळतो. अशीच एक धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे, जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने विवाहित महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवत अनेकदा अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे ‘रक्षकच भक्षक’ बनल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले असून, यामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Beed Police Latest News
नेमकं काय घडलं?
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बीडमध्ये कार्यरत असताना त्यांची पीडित महिलेशी ओळख झाली, जी कालांतराने प्रेमसंबंधात बदलली. मात्र, या प्रेमसंबंधाचा महिलेच्या आयुष्यावर इतका गंभीर परिणाम होईल, याची तिने कल्पनाही केली नसेल. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपी शिंदेंने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले.
दरम्यान, आरोपी रवींद्र शिंदे यांची बदली धाराशिव जिल्ह्यात झाली. बदली झाल्यानंतर हे सर्व थांबेल, असे महिलेला वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. बदली झाल्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्याने पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करणे सुरूच ठेवले. एवढेच नाही, तर तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली.
पोलिसाच्या या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने धाराशिव जिल्ह्यात त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


