Pune News : एकत्र मंच, पण वेगळं मन? शरद पवार – अजित पवार पुन्हा एकदा आमनेसामने, पण संवादशून्य

•एआय’ चर्चा सत्रात दोघांची उपस्थिती; आसन व्यवस्था बदलून टाळले शेजारी बसणे
पुणे | पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर आयोजित चर्चा सत्र एक वेगळ्याच राजकीय रंगात रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली. मात्र, दोन वर्षांपूर्वी राजकीय फाटाफुटीनंतर पहिल्यांदाच दोघे एकाच व्यासपीठावर दिसले, तरी संवादाची नाळ मात्र तुटलेलीच राहिली.
चर्चा सत्रात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस अजित पवार यांचे आसन शरद पवार यांच्या शेजारी ठेवण्यात आले होते. पण अजित पवार व्यासपीठावर येताच त्यांनी आसन व्यवस्था बदलवली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी शरद पवार यांच्याजवळ ठेवण्यात आली. यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याजवळ बसण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन उद्या (10 जून) देशभर साजरा होणार आहे. एक गट पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट बालेवाडी स्टेडियमवर अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिन साजरा करणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर झालेली ही एकत्रित उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
राजकीय वर्तुळात यावरून पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येणार का? याची कुजबुज सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अवघडलेले संबंध आणि मंचावरील अवोइडन्स हेच काहीसं स्पष्ट संकेत देत आहेत की, वाट एकच असली तरी चालण्याचे पाय अजूनही स्वतंत्र आहेत.



