पुणे

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेतील ‘मित्रांची’ राजकीय कुस्ती! – फडणवीस-अजित पवारांनी युती न करण्याचा घेतला निर्णायक फैसला

•’विरोधकांना जागा सोडणार नाही’ या धोरणामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने; दोन शहरांमध्ये महायुतीचे सूत्र बदलले; कटुता नसलेल्या लढतीची घोषणा

पुणे :- राज्याच्या राजकारणात सर्वात लक्षवेधी ठरणारा निर्णय आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या संदर्भात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही शहरांमध्ये महायुती होणार नाही, यावर स्पष्टपणे शिक्कामोर्तब केले आहे. सत्तेत सोबत असलेले हे दोन्ही पक्ष आता महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असले तरी, त्यांनी या लढतीला ‘मैत्रीपूर्ण लढत’ असे संबोधले आहे.

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये युती न होण्याचे महत्त्वाचे कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “आम्ही दोघेही या शहरांमध्ये मोठे पक्ष आहोत आणि जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचा थेट फायदा तिसऱ्या पक्षाला (विरोधकांना) होईल. आम्हाला एवढे राजकारण समजते, त्यामुळे तिसऱ्यासाठी आम्ही जागा ठेवणार नाही.” म्हणजेच, विजयासाठीच हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी शिंदे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे सांगितले. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील, पण ही लढत मैत्रीपूर्ण असेल आणि त्यात कोणतीही कटुता नसेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी दिलेले वक्तव्य आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, त्यांनी “आमची रणनीती निवडणुका लढवण्याचीच असणार,” अशी भूमिका मांडली.

या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, सत्तेतील ‘मित्र’च एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहणार आहेत.

vivek

Recent Posts