Pune News : पुण्यात शिंदे गटात उघड बंड! जागावाटपावरून कार्यकर्त्यांचे नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

Pune Political Latest News : “शिवसेनेचे खच्चीकरण थांबवा!”; भाजपच्या दबावाखाली निर्णय होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा खळबळजनक आरोप
पुणे | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती निश्चित मानली जात असली, तरी जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसैनिकांनी थेट नेत्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. “शिवसेनेला ताकद दिली जातेय की तिचे खच्चीकरण केले जातेय?” असा सवाल विचारत मंगळवारी शेकडो इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
25 जागांची मागणी, भाजपचा नकार
पुणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबतच्या युतीत 20 ते 25 जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजप एवढ्या जागा देण्यास तयार नसल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. भाजपच्या सांगण्यावरूनच शिवसेनेचे निर्णय घेतले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
आंदोलनकर्त्यांचे गंभीर आरोप आणि नाराजी.”आम्ही पाच वर्षे तळागाळात काम केले, त्याचे अहवाल नेत्यांना दिले, पण ते पाहिलेही जात नाहीत. 500 ते 700 इच्छुकांनी फॉर्म भरले असूनही त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही,” अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्यावरही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ते ग्रामीण भागातील नेते आहेत, त्यांना पुण्यातील शहरी राजकारणाची जाण नाही. त्यांच्या निर्णयामुळे शहरात शिवसेनेची स्थिती बिकट होत आहे,” असा दावा काही इच्छुकांनी केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमची व्यथा पोहोचवली जात नाही. संवादाची दारे बंद असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
“भाजपकडून थेट धमकी”
काही कार्यकर्त्यांनी असाही दावा केला की, भाजपचे नेते आम्हाला सांगतात की तुमच्या प्रभागात आमचे चार उमेदवार आधीच ठरलेले आहेत, त्यामुळे तुमचं काही होणार नाही. या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातील शिवसेना कमकुवत केली जात असल्याची खदखद शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर व्यक्त केली.
परिसरात तणाव, पोलिसांचा बंदोबस्त
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.



