Pune Mumbai Express Accident: ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पंढरीच्या वाटेवरील पाच वारकऱ्यांचा मृत्यू
पनवेल : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Expeess Highway )भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
एक्सप्रेसवेवर रात्री बसला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे बस दरीत कोसळली. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसला दरीतून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली . तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास मुंबई पुणे भाविकांच्या बसला ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये असलेल्या ५४ भाविकांपैकी ४२ भाविकांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले तर तीन रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.
बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील असल्याचे समजते. विशेष म्हणजे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना देखील ट्रक्टर एक्सप्रेसवेवर आल्याने पोलीस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.