
Pune Jain Boarding Case Latest News : बिल्डर विशाल गोखले यांनी ‘नैतिकतेच्या’ मुद्द्यावर व्यवहार केला रद्द; धर्मादाय आयुक्तालयाला कळवले
पुणे :- गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा जैन बोर्डिंग हॉस्टेल जमीन विक्रीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. Pune Jain Boarding Case या जागेचा व्यवहार करणारे बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे. Pune Latest News
नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहार रद्द
बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करण्यामागे ‘नैतिकतेचा मुद्दा’ असल्याचे स्पष्ट केले आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलचे चेअरमन आणि ट्रस्टी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या,” म्हणून या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
गोखले यांनी धर्मादाय आयुक्तालयालाही पत्र पाठवून व्यवहार रद्द झाल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
यापूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती.
गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे.
धंगेकर यांच्या आरोपांचे वादळ
या जमीन विक्री व्यवहारावरून शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते, तर मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. महायुतीतील या वादामुळे राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
धंगेकरांचा ‘जिलेबी’चा इशारा
हा व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले होते की, दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार. एकनाथ शिंदे यांनी तोडगा निघेल असे आश्वासन दिल्यानंतर पुढील दोन दिवस मोहोळ यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही, असेही धंगेकर म्हणाले होते.गोखले यांनी व्यवहार रद्द केल्यामुळे आता हा वाद कायमस्वरूपी मिटल्याचे दिसत आहे.



