Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करा; मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
पुणे दि.२४ – Pune Ganesh Festival 2024 | गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे सर्वांना सोबत घेऊन शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेश मंडळांमध्ये आणि उत्सवाच्या नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुड, अलंकार आणि वारजे हद्दीतील गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी Pune Police पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त जी.श्रीधर यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना मंत्री पाटील म्हणाले, आपल्या देशाची मोठी ताकद आपत्तीच्या काळात समाज संघटित होऊन सर्वांना मदत करण्यामध्ये आहे. कोविड काळात गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत केलेले सेवा कार्य अतिशय कौतुकास्पद होते. त्यामुळे एवढी मोठी लोकसंख्या असूनही आपण कोविडवर यशस्वीपणे मात करू शकलो.
ते पुढे म्हणाले, महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. राजकारणातही त्यांचा सहभाग वाढवा यासाठी ३३ टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात महिला मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि उत्सवाच्या नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढणे ही काळाजी गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
उत्सव काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्यासोबतच मंडळांनी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना श्री.पाटील यांनी केली. तसेच, गणेश मंडळांनी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असेही आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अप्पर पोलिस आयुक्त पाटील म्हणाले, आपल्याकडे गणेशोत्सव मंडळ ही मोठी शक्ती आहे, तिचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आणि गरजुंना मदतीसाठी झाला पाहिजे. आगामी काळात गणेशोत्सव साजरा होत असताना मंडळांना आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्यावतीने होईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करू आणि हा उत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त संभाजी कदम यांनी तीनही विभागात एकूण २७८ गणेश मंडळे असल्याचे सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी राखून पर्यावरण आणि आरोग्यवर्धक गणेशोत्सव साजरा करावा. तसेच, मंडळांनी मिरवणुकीत प्लाझ्मा आणि लेझरचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव विधायक आणि सर्वांना सोबत घेऊन साजरा करण्याची ग्वाही दिली.