Vasai Crime News : वसईत विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक; गुन्हे शाखा युनिट-2 ची कामगिरी

Naygaon Police Latest News : नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपीचा चार दिवसांत छडा; उत्तर प्रदेशातून आरोपीला घेतले ताब्यात
वसई/नायगाव :– मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-कक्ष-2, वसई ने विनयभंगाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. नायगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यातील आरोपीचा कौशल्यपूर्ण तपास करून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा तपशील
नायगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी भा.न्या. संहीतेनुसार कलम 354(2) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास 25 वर्षीय पीडित महिला तिवरी फाटक ते काजूपाडा डांबर प्लांट, वसई पूर्व जाणाऱ्या रस्त्यावरून पायी चालत असताना ही घटना घडली.
ती तिवरी फाटकाच्या पुढील एका सर्व्हिस सेंटरजवळ आली असता, मागून आलेल्या अनोळखी आरोपीने तिला अचानक पकडले. पीडित महिला बचावासाठी ओरडू लागल्यावर आरोपीने तिचे तोंड दाबून “चुप होजा नहीं तो, तुझे मार दूंगा” असे धमकावले आणि तिच्या तोंडावर व हातावर मारहाण केली. आरोपीने पीडित महिलेला रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडा-झुडपांमध्ये ओढत नेऊन तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करून लज्जा उत्पन्न केली होती.
आरोपीला अटक
गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा-कक्ष-2, वसईच्या अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्ह्याच्या घटनास्थळापासून ते पश्चिम रेल्वे स्थानकांपर्यंत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला निष्पन्न करण्यात आले. आरोपी राणू कमलेश सिंग (वय 25, रा. नदीगाव, चोपरा, जालीन, उत्तर प्रदेश) याला दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला पुढील कारवाईसाठी नायगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, नायगाव पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-2 वसई युनिटच्या टीमने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.


