Pune Crime News : “पुण्यात सोन्याचा ट्रक”….तब्बल 138 कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई
•Gold truck in Pune, Gold worth 138 crore seized पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.
पुणे :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून नाकाबंदी आणि पोलिसांच्या गस्ती मध्ये वाढ करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठे नेण्यात येत होते. यादृष्टीने तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा आणि रात्रीही संशयित वाहनांची नाकाबंदी करण्यात येत आहे.
सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर साेने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी सोने, तसेट टेम्पो जप्त केले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे.