Pune Crime News : पुण्यात ‘टायर गँग’चा थरारक अंत: ‘शटरतोड’ चोरटा अखेर गजाआड!

Pune Latest Crime News : काळेपडळ पोलिसांची कामगिरी; पुण्यात ‘टायर चोरा’ला ठोकल्या बेड्या!
पुणे :- पुणेकरांनो, सुटकेचा निःश्वास सोडा! शहराला वेठीस धरणाऱ्या ‘टायर गँग’चा थरारक ‘खेळ’ अखेर संपला आहे! रात्रीच्या भयाण अंधारात दुकानांची शटर तोडून नवीन दुचाकीचे टायर चोरून नेणाऱ्या अट्टल ‘टायर चोरा’ला काळेपडळ पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 3 लाख 53 हजार 175 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करत, या धडाकेबाज कारवाईने पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना ‘अखेरचा सिग्नल’ दिला आहे! Pune Police Arrested Gangster
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील काळेपडळ, उंड्री, महंदवाडी, हांडेवाडी, लष्कर आणि गोकुळनगर या भागांतील टायर दुकानदारांची झोप उडवणारे हे सराईत चोरटे, पहाटेच्या वेळी कटावणीने दुकानाचे कुलूप तोडून आत घुसून लाखो रुपयांचे टायर लंपास करत होते. त्यामुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण होते. मात्र, काळेपडळ पोलीस ठाण्यात अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर, पोलिसांनी या ‘मिस्ट्री’ चोरट्याचा शोध घेण्याचा ‘चॅलेंज’ स्वीकारला.


पोलीस अंमलदार महादेव शिंदे आणि लक्ष्मण काळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने, चोराचा माग काढण्यासाठी अक्षरशः 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ‘पोस्टमॉर्टम’ केले. एक-एक फ्रेम बारकाईने तपासली गेली. तासनतास केलेल्या या ‘डिजिटल शिकारी’नंतर, पोलिसांना गुन्हेगार ज्या रिक्षातून येत होता, तिचा नंबर आणि रिक्षातील संशयित व्यक्तीचा चेहरा ओळखण्यात यश आले. हाच धागा पकडून, पोलिसांनी परवेझ लियाकत काझी (वय 45, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) या रिक्षाचालकाला जैन टाऊनशीप येथून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच, परवेझ काझीने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने काळेपडळ येथील दोन गुन्ह्यांसह , भारती विद्यापीठ आणि लष्कर परिसरात केलेल्या टायर चोऱ्यांचीही कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एकूण 58 नवीन दुचाकीचे टायर आणि गुन्हे करताना वापरलेली रिक्षा व कटावणी जप्त करण्यात आली आहे.
राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-5, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग आणि मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे या सर्व कर्मचाऱ्यांनी ही अतिशय प्रशंसनीय आणि थरारक कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे.



