मुंबई

Monsoon Update : अखेर मुंबईत पावसाची पुन्हा दमदार एंट्री!

• कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी; सोलापूरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

गेल्या काही तासांपासून मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली यांसारख्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर थोडा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत आहे. हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोकणातून गायब झालेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनीही पुढील काही दिवस समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असताना, सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे कोरडे पडलेले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. आगळगाव परिसरातील एका युवा शेतकऱ्याचे सोयाबीन पीक या पावसामुळे वाहून गेल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. हवामानातील या बदलांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0