पिंपरी चिंचवड

Pune Crime News : पिंपरी-चिंचवड हादरलं! पत्नीनेच सामाजिक कार्यकर्त्या पतीचा ओढणीने गळा आवळून केला खून

•पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद; मृत नकुल भोईर राष्ट्रवादी (शरद पवार गट) व सामाजिक चळवळीत सक्रिय

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पत्नीनेच सामाजिक कार्यकर्ता असलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. नकुल भोईर असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. काल (बुधवार) सायंकाळी आणि त्यानंतर रात्री देखील दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार वाद झाला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर नकुलच्या पत्नीने ओढणीने गळा दाबून नकुल भोईर यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी

नकुल भोईर यांचा पिंपरी-चिंचवड भागात मोठा जनसंपर्क होता. ते शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रही असायचे.

विशेष म्हणजे, नकुल आणि त्यांची पत्नी दोघेही आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठी तयारी करत होते. पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, असे नकुल यांचे स्वप्न होते. मात्र, नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या त्याच पत्नीने नकुल भोईर यांची कौटुंबिक वादातून हत्या केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0