पुणे

Pune Crime News : पुण्यात ‘अल-कायदा’चे साहित्य बाळगणाऱ्या उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक; बॉम्ब बनवण्याची माहिती असलेले मासिक सापडले

•लाखो रुपयांचे पॅकेज घेणारा जुबेर हंगरगेकर एटीएसच्या जाळ्यात; 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे :- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत, अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय 35) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो मूळचा सोलापूरचा आहे आणि सध्या कल्याणीनगरमधील एका आयटी कंपनीत लाखोंचे पॅकेज घेत नोकरी करतो. तो विवाहित असून, कोंढवा परिसरात कुटुंबासह राहतो.

गुन्ह्याचे स्वरूप आणि जप्त साहित्य

एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी शहरात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या 19 लॅपटॉप आणि 40 मोबाईल फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले.

हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे.

त्याच्याजवळ ‘अल-कायदा इन्स्पायर’ मासिकातील एके-47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आले आहेत.

असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मित्राला चौकशीसाठी ताब्यात

हंगरगेकर चेन्नईहून परतल्यानंतर त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारावर पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मित्राकडील मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी केली जात आहे.

तपासाची व्याप्ती

एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. जुबेर हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी काही थेट संबंध होता का? त्याच्याकडे हे साहित्य कोणत्या उद्देशाने होते? तसेच, त्याच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत आणि त्यांनी आणखी कोणाला अल-कायदाचे सदस्य होण्यासाठी माहिती दिली आहे का? याचा तपास एटीएसकडून केला जात आहे.

पुणे न्यायालयाने आरोपी जुबेर हंगरगेकरला 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0