पुणे

Pune Crime News : नांदेडसिटीत रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद

•पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे :- शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेत नांदेडसिटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोल्हेवाडी बस स्टॉप येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी बनावटीच्या पिस्तुलासह अटक करण्यात आले आहे. या आरोपीकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे 35 हजार 500 रुपये आहे.

नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बंटी मोरे आणि स्वप्नील मगर हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. कोल्हेवाडी येथील बस स्टॉपवर सार्थक बाळासाहेब भगत (वय 22, रा. कोल्हेवाडी फाटा, सिंहगड रोड) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोल्हेवाडी बस स्टॉपवर सापळा रचला. पोलिसांनी आरोपी सार्थक भगत याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले. आरोपीविरुद्ध नांदेडसिटी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर यापूर्वीही हवेली पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

vivek

Recent Posts