पुणे

Pune Crime News : दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश! महिला अधिकारी आणि खाजगी सर्वेयर एसीबीच्या जाळ्यात

•जमिनीच्या वाटपासाठी मागितली होती 14 हजार रुपयांची लाच; 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक

पुणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोठी कारवाई करत एक महिला अधिकारी आणि एका खाजगी सहाय्यक सर्वेयरला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जमिनीच्या वाटपाचा अहवाल तयार करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी वैशाली चंद्रकांत धसकटे (वय 42,पद – परीक्षण भूमापक, )दौंड भूमी अभिलेख कार्यालय आणि फय्याज दाऊद शेख (वय 35,पद- खाजगी सहाय्यक सर्वेयर), यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदार शेतकरी यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाचा दावा दौंड न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने या जमिनीच्या वाटपासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, भूमापक वैशाली धसकटे यांनी जमिनीची मोजणी केली. मात्र, या मोजणीचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून तो तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी तसेच तक्रारदाराला ‘क’ प्रत देण्यासाठी धसकटे यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली.

या लाच मागणीमुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने 4 ऑगस्ट रोजी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने 11 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता धसकटे यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर तडजोडीअंती ती रक्कम 14 हजार रुपयांवर आली.

20 ऑगस्ट रोजी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात धसकटे यांच्या सांगण्यावरून खाजगी सर्वेयर फय्याज शेख यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी, एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.

या दोन्ही आरोपींविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0