Pune Breaking News : पुण्याहून मुंबईला धक्का; हॉटेल कर्मचाऱ्याच्या धमकीने सुरक्षा यंत्रणा हादरल्या!

Pune Crime News : हॉटेल मालकाला गोळ्या घालण्याची, मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; पुणे पोलिसांच्या माहितीमुळे मुंबई अलर्ट
पुणे | पुण्यातील एका हॉटेलमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हॉटेल मालकाला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीसोबतच त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचीही गंभीर धमकी दिल्याने पुणे आणि मुंबईच्या सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. हॉटेल मालकाने तत्काळ पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर, पुणे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता मुंबई पोलिसांना याबाबत कळवले. या माहितीमुळे मुंबईतील सर्व संबंधित यंत्रणांना तात्काळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
कोथरूड येथील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या संदीप गाडे यांनी सोमवारी मध्यरात्री पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. त्यांच्या सातारा येथील हॉटेलमध्ये संदीप सिंग नावाचा कामगार कार्यरत होता, जो दोन दिवसांपूर्वी नोकरी सोडून निघून गेला. याच संदीप सिंगने फोन करून गाडे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आणि मुंबईत स्फोट घडवण्याचीही धमकी दिली. या माहितीनंतर कोथरूड पोलिसांनी गाडे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि तातडीने मुंबई पोलिसांना कळवले. नियमांनुसार, मुंबईतील सर्व यंत्रणांना, ज्यात दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलीस यांचा समावेश आहे, त्यांना सतर्क करण्यात आले.


