Priyanka Gandhi : ‘इंडिया’ आघाडीचे खासदार अटकेत; प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

•’वोट चोरी’च्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जात असताना कारवाई
ANI :- विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जात असताना ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सपाच्या डिंपल यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह सुमारे 300 खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या घटनेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “देशभरात होत असलेल्या ‘वोट चोरी’च्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात होतो, पण आम्हाला ताब्यात घेण्यात आले. नरेंद्र मोदी यांचे भित्रे सरकार जनतेचा आणि विरोधकांचा आवाज दाबून टाकू इच्छिते. मात्र, आम्ही घाबरणार नाही, मागे हटणार नाही. जनतेच्या अधिकारांवरील प्रत्येक हल्ल्याचा आम्ही सामना करू.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “हा निवडणूक आयोगाचाच डेटा आहे, माझा नाही की मी त्यावर प्रतिज्ञापत्रक द्यावे. हा डेटा त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकावा, म्हणजे सगळ्यांना सत्य समजेल. हे केवळ बंगळूरमध्येच नाही, तर अनेक ठिकाणी घडले आहे.” राहुल गांधी पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाला माहीत आहे की त्यांचा डेटा उघड होईल. ते जे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही बाहेर काढणारच,” असा इशारा त्यांनी दिला.
फोटो गॅलरी

















