मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आणि संवाद साधणार; पक्षबांधणीसाठी भेटीला महत्त्व

Raj Thackeray Latest News : अंबरनाथ शहराध्यक्षासह माजी नगरसेवकांनी सोडली होती साथ; शैलेश शिर्के यांची नव्या शहराध्यक्षपदी निवड

अंबरनाथ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षातील फुटीनंतर आज (शुक्रवारी) अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

गेल्या महिन्यात अंबरनाथ शहराचे मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर मनसेमध्ये संतापाची लाट उसळली होती. पक्ष सोडून गेलेले लोक फक्त पैशांसाठी गेले असून, त्यांना आगामी पालिका निवडणुकीत त्यांची जागा दाखवू, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता.

या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी अंबरनाथमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे यांनी स्वतः जुने निष्ठावंत पदाधिकारी शैलेश शिर्के यांची अंबरनाथच्या नव्या शहराध्यक्षपदी निवड केली होती.

आता या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः अंबरनाथ शहरात येत आहेत. पक्षाची पडझड थांबवून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे उद्दिष्ट या भेटीमागे आहे. अंबरनाथमध्ये राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

केवळ अंबरनाथच नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीमध्येही मनसेला खिंडार पडले आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीतही जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0