Prashant Thakur : सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण; सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या
पनवेल : राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, CM Eknath Shinde उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Devendra Fadanvis उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबरीने पनवेल परिसरातील समस्याही त्यांनी सभागृहात पोटतिडकीने मांडल्या. आणि त्या लवकरात लवकर सुटण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली तसेच ज्या प्रमाणे राज्यात विकास होत आहे त्यानुसार हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही व्यक्त केला.
नुकताच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर भाषणात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात म्हंटले कि, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, महिलांना आणि युवकांना समर्पित आहे. ३० जून २०२२ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि तेव्हापासून या महाराष्ट्राने नव्याने कात टाकलेली आपण पाहत आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचे जनताभिमुख निर्णय घेतले. त्या निर्णयांना २०१९ नंतर ब्रेक बसला होता तो ब्रेक आता निघालेला आहे. धडाडी आणि संयमी नेतृत्वातून घौडदौड सुरु झाली आहे. गेल्या दोन वर्षात लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आणि आत्ताच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आजवर सुरु झालेल्या लोकोपयोगी निर्णयांचा एका अर्थाने कळस चढत आहे, त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. वारकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आणि सोयीसुविधांबद्दल आभार व्यक्त करत असताना विशेषत्वाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी अशा दिशादर्शक योजना त्याचबरोबरीने स्टार्टअप आणि उच्च शिक्षणासाठी फी माफ करणे अशा योजनेतून महिलांचे सबलीकरण करण्याचे काम हाती घेत हे सरकार जागरूक असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करून राज्य महिलांच्या हातात देण्याचे काम होत आहे हा संदेशही दिला आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भाषणाच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल परिसरातील समस्यांनाही हात घातला. नैना, वीज, पाणी विषय त्यांनी पोटतिडकीने मांडला. ज्या प्रमाणे राज्यात विकास होत आहे त्यानुसार हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले कि, विविध प्रकारचे अनेक प्रकल्प गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत साकार होत आहेत. आणि त्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक भागात आश्वासक असा विकास होत असताना दिसत आहे. सर्व समाज घटकांना सामावून घेणारा हा विकास आहे. अटल सेतूमुळे पनवेल, उरण किंबहुना रायगड जिल्ह्याचे चित्र विकासात बदलले आहे. विमानतळ पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे एकीकडे अटल सेतूने जोडणारा भाग आहे, विमानतळ होत आहे. त्यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात विकास होताना पहायला मिळणार आहे. असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मागण्या अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले कि, नैना प्राधिकरणाची स्थापना केली गेली त्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास व्हावा. मात्र या परिसरातील काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत अडचणी आहेत, त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. योग्य पद्धतीने संसाधनाचे नियोजन करणे आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीसाठी कणखर भूमिका आवश्यक आहे. पनवेल एसटी बसस्थानक बीओटी तत्वावर बनतोय पण वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी मधल्या काळात आल्या. बीओटीचा कंत्राटदार अजूनही काम सुरु करत नाही जर योग्य वेळेत हा कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला दिलेले काम रद्द करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी शासन योग्य ती कार्यवाही करेल अशी खात्री आहे. नैनाच्या परिसरात विकास होत असताना त्याचबरोबरीने मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. नवी मुंबईची मेट्रो उशिराने सुरु झाली, त्यामुळे या परिसरातील मेट्रोच्या कामाला वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आरडीसीसीच्या माध्यमातून देवेंद्रजींनी ४८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र त्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पनवेलसारख्या शहरामध्ये व्यापारी समाज हैराण झाला आहे. वाहिन्या भूमिगत करण्याची गरज आहे आणि यासाठीही शासनाने तातडीने निधी देण्याची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा योजनेच्या दृष्टिकोनातून एमजीपी टप्पा ३चे काम सुरु झाले आहे. सप्टेंबरपर्यंत ते काम पूर्ण होणे आवश्यक आहे पण त्या कामात दिरंगाई होताना दिसत आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी पाण्याचा तुडवडा भासत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरबे धारण आहे, या धरणातील पाणी पुरवठा फक्त नवी मुंबईसाठी आहे अशी भूमिका नवी मुंबई महापालिकेची आहे. पण या महापालिकेची एकट्याची मालकी या धरणावर असून चालणार नाही. परिसरातील सर्व नवी मुंबईला पाणी पुरवठा योग्य प्रकारे झाला पाहिजे. पाणी देण्यात पनवेल महापालिका वासियांना सावत्रपणाची वागणूक नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिली जाते त्यावर शासनाने अंकुश आणण्याची गरज आहे. त्याचबरोबरीने वाढती लोकवस्ती पाहता नवीन धरणे बांधण्याची गरज असल्याचेही शासनाच्या लक्षात आणून देत तशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात केली.
या सर्व परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार सकरात्मक पाऊले टाकत आहे पण घेतलेल्या निर्णयांची वेळेत अंमलबजावणी व्हावी. अनेक महत्वकांक्षी प्रकल्प या परिसरात सुरु झाल्यामुळे प्रचंड असे विकासाचे चक्र नवी मुंबई पनवेल परिसरात सुरु आहे, ते अखंडित चालू राहण्यासाठी अशा प्रकारच्या अर्थसंकल्पाची गरज होती. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण सरकारचे आभार व्यक्त करतो.