मुंबई

Prasad Lad : “मराठी माणसाची दिशाभूल करू नका!” — भाजप आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Prasad Lad : “मराठी प्रेम केव्हा जागं झालं? मुख्यमंत्री असताना कुठं गेला होता स्वाभिमान?”

मुंबई | राज्यात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींवर भाजप आमदार प्रसाद लाड Parasad Lad यांनी थेट टीकास्त्र सोडले आहे. “मराठी माणसाच्या भावना भडकवून दिशाभूल करणं हा राजकीय अजेंडा आहे,” असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना मराठी प्रेम आठवलं नाही. त्यावेळी ज्यांनी मुंबईवर हल्ला केला, त्यांच्या कबरी शिवसेनेने सजवल्या. हिरव्यांच्या चरणी लोटांगण घातलं, तेव्हा कुठं होतं मराठी स्वाभिमान?” असा खवळलेला सवाल लाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “हिंदी सक्ती झालेलीच नाही. मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की हिंदी ऐच्छिक आहे. मग ठाकरे बंधू कोणता धोक्याचा बागुलबुवा उभा करत आहेत?”

प्रसाद लाड यांनी शिवसेना-मनसेच्या संभाव्य जवळिकीवरही सवाल उपस्थित करत टोला लगावला की, “२५ वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता होती, तरी मराठी माणसासाठी काहीच केलं गेलं नाही. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर ढोंगी अस्मितेचं नाटक रंगवलं जात आहे.”

“जेव्हा ठाकरे गट सत्तेत होता, तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले होते — ‘ज्यांच्याकडे एकही नगरसेवक नाही, त्यांच्याशी चर्चा तरी का करायची?’ आज मात्र राज ठाकरेंच्या आधारावर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे,” असा स्पष्ट हल्ला करत लाड म्हणाले की, “ठाकरे गटाकडे ना कार्यकर्ते उरले, ना मतदार, ना नेते — जे आहेत ते ही हळूहळू निघून चालले आहेत.”

vivek

Recent Posts