राजकीय ‘भू-कंपाचे संकेत’! – शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट; महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांचा पाढा वाचला

•बीडमधील तीन खून प्रकरणांवरून थेट दिल्लीत धाव; अतिवृष्टीग्रस्तांसाठी NDRF कडून भरीव मदत आणि निवडणुकीतील हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी
नवी दिल्ली :- राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत खासदारांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्तींशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न अमित शाह यांच्यापुढे मांडले.
बीडमधील हत्याकांड आणि न्यायव्यवस्थेवर चिंता
खासदारांनी गृहमंत्री शहा यांचे लक्ष प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे वेधले. त्यांनी बीड जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली:
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर शासन व्हावे.
स्व. महादेव मुंडे खून प्रकरणी तपास प्रगतीपथावर नसून, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी.
स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी जलद तपास पूर्ण करून दोषींना शासन व्हावे, अशी जोरदार भूमिका मांडली.
राज्यातील आपत्कालीन मदतीचा मुद्दा
यासोबतच, खासदारांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील अमित शाह यांना दिला. अतिवृष्टीग्रस्तांची दुरवस्था लक्षात घेऊन, केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्तीनिवारण कोषातून (NDRF) महाराष्ट्राला भरीव मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.
लोकशाहीतील हिंसाचारावर चिंता
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हिंसाचार आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळलेली रोख रक्कम यावरही खासदारांनी चिंता व्यक्त केली. ‘सुदृढ लोकशाहीसाठी हे चित्र योग्य नाही,’ असे मत व्यक्त करत त्यांनी या गैरप्रकारांवर गृह मंत्रालयाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.
या महत्त्वपूर्ण भेटीसाठी अमित शाह यांनी वेळ दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदारांनी त्यांचे आभार मानले.



