‘ऑपरेशन सिंदूर’ वरून राजकीय रणकंदन: PoK वरून भाजप बॅकफूटवर?

•राजनाथ सिंहांच्या विधानाने नवा वाद; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
ANI :- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत केलेल्या विधानामुळे सोमवारी (28 जुलै) देशाच्या राजकारणात नवी वादळी चर्चा सुरू झाली आहे. सिंह यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेचा उद्देश पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) ताब्यात घेणे हा नव्हता, तर दहशतवादाची पाळेमुळे खणून काढणे हा होता. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत म्हटले आहे की, “राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये घुसून PoK वर कब्जा घेण्याचा आमचा इरादा नव्हता, ही खूप गंभीर बाब आहे.” एएनआयच्या वृत्तानुसार, राऊत पुढे म्हणाले, “भाजप वारंवार सांगत होती की, जर पंतप्रधान (नरेंद्र मोदी) दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर PoK भारताचा भाग बनवू. ही गोष्ट योगी आदित्यनाथही बोलत होते.”
राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “लोकसभेत अमित शाह बोलत होते की, PoK साठी आम्ही बलिदान देऊ, पण काल त्यांचे संरक्षण मंत्री म्हणत आहेत की आमचा असा कोणताही उद्देश नाही. आणि त्या भाषणाचा पंतप्रधान गौरव करतात. म्हणजेच भाजपची इच्छा स्पष्ट आहे की, ते पाकिस्तानशी लढू इच्छित नाहीत. ते अखंड भारत बनवू इच्छित नाहीत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला PoK देखील मिळवू इच्छित नाहीत. मग हे सरकार कशासाठी बसले आहे?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी सोमवारी (२८ जुलै) संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्णपणे यशस्वी झाले असून, मिशनचे पूर्वनियोजित सर्व उद्दिष्टे साध्य केली आहेत. “कोणत्याही दबावाखाली ऑपरेशन थांबवण्याची बाब निराधार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या सैन्य कारवाईचा उद्देश कोणत्याही क्षेत्रावर कब्जा करणे नसून, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे आणि अलीकडील पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय मिळवून देणे हा होता, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.


