पोलीसच निघाला ड्रग्ज तस्कर! अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदाराला पुण्यात अटक; मुद्देमाल कक्षातून अमली पदार्थांची चोरी

Ahilyanagar Police Arrested Sealing Drugs : खाकी वर्दीला काळिमा! जप्त केलेले ड्रग्ज चोरून बाहेर विकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश; वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात
अहिल्यानगर/पुणे l ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला हरताळ फासत गुन्हेगारांचे रक्षण आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका पोलीस हवालदाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अहिल्यानगर पोलीस दलातील शामसुंदर गुजर हा हवालदार चक्क पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून (Strong Room) जप्त केलेले ड्रग्ज चोरून त्याची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कसा उघड झाला हा ‘काळा’ धंदा?
या प्रकरणाची पाळेमुळे 17 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये सापडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी शादाब शेख या गॅरेज चालकाला एक किलो अंमली पदार्थांसह रंगेहात पकडले होते. शादाबची कसून चौकशी केली असता, त्याने हे ड्रग्ज अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर आणि महेश गायकवाड यांच्याकडून आणल्याचे कबूल केले.
पुणे पोलिसांनी तातडीने पारनेरमधील या आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून तब्बल 9 किलो 655 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. जेव्हा पोलिसांनी या आरोपींना इतका मोठा साठा कुठून मिळाला असे विचारले, तेव्हा त्यांनी थेट अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदार शामसुंदर गुजर याचे नाव घेतले.
पोलीस ठाण्यातूनच ड्रग्जची चोरी; वरिष्ठही रडारवर?
हवालदार शामसुंदर गुजर हा मुद्देमाल कक्षात कामाला होता. अहिल्यानगर पोलिसांनी मे 2025 मध्ये श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला अंमली पदार्थांचा मोठा साठा तिथे सील करून ठेवण्यात आला होता. गुजरने डिसेंबर महिन्यात हा मुद्देमाल चोरला आणि त्या जागी हुबेहूब दिसणारी दुसरी वस्तू ठेवून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली.
जप्त केलेले ड्रग्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीने आणि कोर्टाच्या आदेशानुसार सील असतात. त्यामुळे गुजरने इतकी मोठी चोरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय कशी केली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून पुणे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
अंमली पदार्थ: एकूण 10 किलो 707 ग्रॅम
आरोपी: 5 (हवालदार शामसुंदर गुजरसह)
इतर: गुन्ह्यात वापरलेली वाहने
अहिल्यानगरमधील या प्रकाराने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे कोणाकोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



