Bhiwandi Crime News : भिवंडीत निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; पिस्टलसह एकाला अटक, गुन्हे शाखेची खदान रोडवर धडक

•महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गुन्हेगार वॉच’ पेट्रोलिंग दरम्यान कारवाई; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भिवंडी | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भिवंडी पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक नजर ठेवली आहे. याच मोहिमेअंतर्गत 1 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा घटक-2 च्या पथकाने शास्त्रीनगर भागातील खदान रोड येथे कारवाई करत अक्षय दिपककुमार वर्मा उर्फ शिवा (वय 29) याला बेकायदेशीर अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे.
गुप्त बातमीदाराने दिली माहिती
गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना माहिती मिळाली होती की, शास्त्रीनगर येथील खदान रोडवरील एका टेम्पोजवळ एक इसम संशयास्पदरीत्या शस्त्र घेऊन बसला आहे. या माहितीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शास्त्रीनगर टेकडीजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरात सापळा रचला.
अंगझडतीत सापडले घातक शस्त्र
पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या अक्षय वर्मा याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे 1 माऊझर पिस्टल आणि 1 जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे शस्त्र तात्काळ जप्त केले असून आरोपीविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम (Arms Act) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तपास पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सुनील साळुंके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



