PNB Bank Locker Fraud | पंजाब नॅशनल बँकेतील लॉकर परस्पर उघडून अडीच कोटींचा अपहार : मॅनेजर, ज्वेलर्ससह तिघांवर गुन्हा
- PNB Bank Locker Fraud | बँकेतील लॉकर किती सुरक्षित ?
पुणे, दि. २६ सप्टेंबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
PNB Bank Locker Fraud | मालमत्ता, रक्कम, दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचे लॉकर सुरक्षित मानले जाते, परंतु आता बँकेतील मॅनेजर लॉकर परस्पर उघडून फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर भागातील एका व्यावसायिकाचे बँकेतील लॉकर परस्पर उघडून तब्बल २ कोटी ७८ लाख रुपयांचे हिरेजडित दागिने, रोख रक्कम लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेची मॅनेजर, सराफ व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी यश केशवलाल कपूर, वय -४७, रा. सोपानबाग, पुणे यांनी तक्रारीवरून संशयित आरोपी पंजाब नॅशनल बँकेची व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंद्र शहानी आणि सराफ व्यावसायिक सतीश पंजाबी यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PNB Bank Locker Fraud
डॉ. आंबेडकर चौक कॅम्प येथील अरोरा टॉवर स्थित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत सदर प्रकार घडला आहे.
दोन महिन्यापूर्वी फिर्यादी कपूर यांनी बँकेतील लॉकर तपासणी केली असता तेथे मुद्देमाल सुरक्षित होता. त्यानंतर ६ सप्टेंबरला ते बँकेत गेले असता त्यांचे लॉकर १३ ऑगस्ट रोजी परस्पर उघडले असल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळी Pune Police पोलीस उपायुक्त परिमंडळ -२ स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी भेट दिली.
आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे करीत आहेत.