Mumbai Crime News : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 25 लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त

•कुर्ला येथील गोदामांवर छापा; एका आरोपीला अटक, प्रतिबंधीत वस्तूंमुळे खळबळ
मुंबई :- गुन्हे शाखा, कक्ष-6 ने कुर्ला पश्चिम येथील दोन गोदामांवर छापा टाकून शासनाने प्रतिबंधीत केलेला 25 लाखांहून अधिक किमतीचा इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) आणि तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्सचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीचा पर्दाफाश झाला आहे.
गुन्हे शाखा, कक्ष-6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, कुर्ला येथील माकडवाला कंपाऊंडमध्ये एका व्यक्तीने ई-सिगारेटचा अनधिकृत साठा करून ठेवला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात उबेद मोहमद सलीम शेख (वय 31) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विविध कंपन्या आणि फ्लेवर्सचे एकूण 1884 ई-सिगारेट, विविध तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवर्स आणि रोख रक्कम असा एकूण 25 लाख 50 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उबेद शेख याच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९ आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, कक्ष-6 करत आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त लखमी गौतम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत होते. या यशस्वी कारवाईमुळे बेकायदेशीर वस्तूंच्या विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे.


