PM Narendra Modi : नवी मुंबई विमानतळात ‘विकसित भारताची झलक’; PM मोदींकडून कमळ डिझाइनचे महत्त्व स्पष्ट

•’मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळख मिळेल; भूगर्भातील मेट्रोमुळे मोठा फायदा’;’2014 पर्यंत 74 असलेले विमानतळ आता 160 च्या पुढे; हवाई चप्पल घालणाराही हवाई प्रवास करणार’
नवी मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. मुंबई महानगरातील दुसरे मोठे विमानतळ असलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी विकसित भारताचे स्वप्न आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीवर भाष्य केले.
‘कनेक्टिव्हिटीचे हब आणि भूगर्भातील मेट्रो’
पंतप्रधान मोदींनी जनतेला विजया दशमी, कोजागिरी पौर्णिमा आणि आगामी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळखलं जाईल.”
याचबरोबर त्यांनी मुंबईतील नवीन प्रकल्पांचा उल्लेख केला. “आज मुंबईला भूमिगत मेट्रो मिळाली आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.” मुंबईसारख्या व्यस्त शहरात सर्व इमारतींना व्यवस्थित ठेऊन जमिनीच्या खाली ही मेट्रो सेवा सुरू केल्याबद्दल त्यांनी सर्व इंजिनिअरांचे अभिनंदन केले.
विमानतळात ‘विकसित भारताची झलक’
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आल्याबद्दल मोदींनी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. विमानतळाच्या रचनेबद्दल बोलताना ते म्हणाले, “नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते.” तसेच, “हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहे. या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे आहे, याचा अर्थ हे संस्कृती आणि समृद्धीचं एक प्रतिक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्रातील शेतकरी युरोपशी जोडले जातील’
पंतप्रधानांनी या विमानतळाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महाराष्ट्राचे शेतकरी युरोप आणि बाहेरच्या देशांबरोबर देखील जोडले जातील.” या विमानतळामुळे मोठे उद्योग आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मोदींनी देशातील हवाई सेवेतील क्रांतीचा उल्लेख केला. “जेव्हा 2014 मध्ये जनतेने मला संधी दिली, तेव्हा मी म्हटलं होतं की, हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यायला हवा.” हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन विमानतळे बनवणे गरजेचे होते, असे सांगत ते म्हणाले, “2014 पर्यंत आपल्या देशात फक्त 74 विमानतळ होते, पण आज भारतातील एकूण विमानतळांची संख्या 160 च्या पुढे गेली आहे.”
छोट्या शहरांमध्ये विमानतळ व्हावे आणि लोकांना स्वस्तात हवाई प्रवासाचा विकल्प मिळावा यासाठी ‘उडान’ योजना सुरू केल्याचेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.



