PM Modi : स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पीएम मोदींचे राष्ट्रसंबोधन: ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख, दहशतवादावर हल्लाबोल

एक देश, एक संविधान’ साकारल्याने श्यामा प्रसाद मुखर्जींना खरी श्रद्धांजली!
ANI :- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईचा उल्लेख करत, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने कसा सूड घेतला, याची माहिती दिली. दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आता वेगळे मानले जाणार नाही, असा इशारा देत भारताने दहशतवादाविरोधात नवा ‘न्यू नॉर्मल’ स्थापित केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हे 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाचे क्षण आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’चा जयघोष सुरू आहे. भारत एकतेची भावना अधिक मजबूत करत आहे.’ यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 150 व्या जयंतीचाही उल्लेख केला. “स्वातंत्र्यानंतर संविधानासाठी बलिदान देणारे ते पहिले देशभक्त होते. कलम 370 रद्द करून ‘एक देश, एक संविधान’ हे त्यांचे स्वप्न आम्ही साकारले, ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे,” असे मोदी म्हणाले.
पहलगाम येथील हल्ल्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त झाला होता. “या क्रूर हल्ल्यानंतर आम्ही सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. रणनीती, उद्दिष्टे आणि वेळ निश्चित करण्याची जबाबदारी आम्ही सैन्यावर सोपवली. त्यानंतर आमच्या शूर जवानांनी अनेक दशकांपासून जे घडले नव्हते, ते करून दाखवले. शेकडो किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले,” असे सांगत ऑपरेशन सिंदूर ही संतापाची अभिव्यक्ती असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
“या हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की पाकिस्तानमध्ये अजूनही त्याची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत असलेल्या भारताने आता वेगळा मार्ग निवडला आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना आता वेगवेगळे मानले जाणार नाही,” असा इशारा पंतप्रधानांनी दिला.



